जि.प. शाळा सिद्राममळा च्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत ……….

चला खेळ खेळूया

शिवाजी म्हणतो..


पळापळीचे, उडया मारण्याचे खेळ खेळून झाल्यावर खूप दमायला होतं. अशा वेळी जेव्हा पळापळीचे खेळ खेळायचा कंटाळा येतो, तेव्हा एखादा बैठा खेळ खेळावासा वाटतो. त्यातलाच एक मजेशीर खेळ म्हणजे ‘शिवाजी म्हणतो..’ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, शिवाजी म्हणतो म्हणजे नक्की काय? आणि हा खेळ कसा काय होऊ शकतो? म्हणूनच आपण या जुन्या खेळाविषयी अधिक जाणून घेऊया..
कोणताही खेळ खेळायचा म्हणजे त्यामध्ये आधी सुटावं लागतं. जो शेवटी राहणार त्याच्यावर राज्य हा नियम सगळ्याच खेळाप्रमाणे या खेळातही लागू होतो, पण या खेळात आणि इतर खेळातला मुख्य फरक असा की, इतर खेळात राज्य येणा-या एकटया खेळाडूला इतर खेळाडूंना पकडावं, शोधावं लागतं. मात्र या खेळात जो खेळाडू शेवटचा सुटणार त्याच्यावर नियमाप्रमाणे राज्य येतं. तो ‘शिवाजी’ बनतो आणि इतरांना आज्ञा करतो. तो जे सांगणार ते इतर खेळाडूंना ऐकावं लागतं. मग तो, ‘शिवाजी म्हणतो, हसा’, डोक्याला हात लावा’, ‘हसता हसता मधेच थांबा’, ‘डोळे बंद करा’ अशी फर्मानं सोडतो आणि इतर खेळाडू ती ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात. जो खेळाडू त्याच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा चुकेल तो त्या खेळातून बाद होतो. या प्रकारे सगळे बाद होईपर्यंत हा खेळ सुरू राहतो. सगळे बाद झाल्यावर दुसरा कोणीतरी खेळाडू शिवाजी बनतो आणि हा खेळ चालू राहतो. बैठा आणि गमतीशीर असलेला हा खेळ खेळायला खूप मजा येते.

पिदवणी

हा खेळ प्रामुख्याने पावसाळयात खेळाला जातो. पाऊस पडत असला कि अंगणात इतर खेळ खेळता येत नाही तर पण थोडा पाऊस थांबला की हा खेळ खेळता येतो. जमीन ओलसरच असावी. यासाठी दोन किंवा कितीही मुले चालतात.
एक लोखंडाची छोटीशी ६ ते ९ इंच लांबीची काडी घ्यायची. बारीक गजाचा तुकडा, किंवा मोडक्या छत्रीची लहानशी काडी ही चालेल. पण कडक हवी. एकावर राज्य द्यायचे व इतरांनी ती काडी ओल्या जमिनीत चिखलात रुतवायची अशी फेकायची की जमिनीत खोचली गेली पाहिजे. पडली तर डाव गेला अशी काडी रुतवत फेकत लांब जायचे डाव जाईपर्यंत सर्व भिडूंनी लांब लांब न्यायचे व नंतर राज्य असलेल्या मुलाने तेथपासून मूळ ठिकाणापर्यंत लांगडी घालत यायचे. जास्त मुले असली की खूप लांब दमछाक होते म्हणून याला पिदवणी म्हणायचे एखाद्या खेळात दमवणे याला 'पिदवणे ' असे म्हणत असत.

लेखन : माधुरी अंतरकर

चोरचिठ्ठी

उन्हाळा म्हटलं की, आपल्याला घरी बसून बैठे खेळ खेळणं जास्त सोयीचं वाटतं. कारण उन्हात धावपळीचे खेळ खेळून आपण थकून जातो. अशा वेळी चोरचिठ्ठी हा खेळ खेळायला छान आहे. या खेळाची आणखी एक गंमत म्हणजे या खेळात कोणताही खेळाडू बाद होत नाही. या खेळात राजा, राणी, प्रधान, चोर, पोलिस असे पाच जण असतात आणि प्रत्येकाला गुण असतात. म्हणजे राजाला पन्नास, राणीला चाळीस, प्रधानाला तीस, पोलिसांना वीस आणि चोराला दहा गुण. या खेळाची सुरुवात करताना वहीचं एक कोरं पान घ्यायचं. त्या पानाच्या पाच चिठ्ठय़ा करायच्या आणि पानाच्या प्रत्येक चिठ्ठीवर राजा, राणी, चोर, पोलिस, प्रधान अशी नावं लिहायची. सर्व मुलांनी गोल करून बसायचं आणि त्या गोलात कोणी एका मुलाने या सगळ्या चिठ्ठय़ा एकत्र करून उडवायच्या. प्रत्येक मुलाने आपापली चिठ्ठी उचलायची. चिठ्ठी उघडून पाहिल्यावर त्या चिठ्ठीत जे नाव असेल ते कोणालाही सांगायचं नाही. ज्या मुलाच्या हाती ‘पोलिस’ असं लिहिलेली चिठ्ठी येईल, त्याने मात्र ते सगळ्यांसमोर जाहीर करायचं. नंतर पोलिस असलेल्या खेळाडूने ‘चोर’ कोण आहे हे ओळखायचं.
चोर ओळखायला त्याला कोणीही मदत करायची नाही. प्रत्येक खेळाडूने इशारे न करता गुपचूप बसून राहायचं. जर त्या खेळाडूने चोराला बरोबर ओळखलं, तर तो जिंकला आणि चुकीचा चोर ओळखला तर तो हरला. तो जिंकला तर त्याला चोर आणि स्वत:चे मिळून तीस गुण मिळतील आणि हरला तर शून्य आणि ते तीस गुण चोराला जातील. या खेळाच्या अशा अनेक फे-या चालतात. पहिली फेरी संपली की, एका कागदावर सगळ्यांचे गुण नोंदवले जातात. मग पुन्हा चिठ्ठय़ा उडवून खेळ सुरू करायचा. हा खेळ तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ तुम्ही खेळू शकता. खेळाच्या शेवटी सगळ्यांचे गुण मोजले जातात, ज्याला सगळ्यात जास्त गुण असतील तो ‘चोरचिठ्ठी’ खेळाचा विजेता बनतो आणि या खेळात चिठ्ठय़ा एकदाच बनवायच्या आणि त्या जपून वापरायच्या. अशाने वह्यांची पानं खराब होत नाहीत.

कांदाफोडी

कांदाफोडी हा एक गमतीदार खेळ आहे. या खेळीची गंमत म्हणजे हा खेळ तुम्ही कितीही जणांत खेळू शकता. या खेळात तुम्हाला शक्य तितक्या उंच उडय़ा मारायच्या असतात. ज्याच्यावर राज्य आहे तो खाली पाय पसरून बसतो आणि बाकीचे खेळाडू त्याचा पाय ओलांडून जात असतात. या खेळाच्या दुस-या फेरीत राज्य असलेला एकावर एक पाय ठेवून बसतो. एकावर एक ठेवलेल्या पायाला ओलांडणारा खेळाडू त्याच्या पायाने स्पर्श करतो, त्यालाच कांदाफोडी असं म्हणतात. या प्रकारे खेळ सुरू झाल्यावर राज्य असलेला आपल्या लांब केलेल्या पायांवर एका हाताची करंगळी धरतो आणि हात सरळ ठेवतो. उर्वरित खेळाडू ते ओलांडून जातात. मग बसलेला खेळाडू एक करंगळीवर दुसरी करंगळी ठेवतो, त्यानंतर पुन्हा सगळे खेळाडू त्याला ओलांडतात.
दुसरी आणि तिसरी फेरी कोणीही सहज ओलांडून जातो. पण जेव्हा राज्य असलेला हात-पाय एकावर एक धरून तो मनोरा उंचावतो, तेव्हा खरी मजा येते. प्रत्येक वेळी तो जे करेल, त्यावरून प्रत्येकाने उडी मारायची असते. उडी मारताना मारणारा पडला किंवा त्याच्या हात किंवा पायाचा स्पर्श झाला तर तो बाद होतो. हाता-पायाच्या वेगवेगळ्या अवस्था झाल्यावर राज्य असलेला हाताने पायाचे अंगठे पकडून ओणवा उभा राहतो. फक्त या वेळीच खेळाडूंनी त्याला उडी मारताना हात लावला तर चालतो. सरतेशेवटी राज्य असलेला उभाच राहतो, त्या वेळी त्याला ओलांडून जाणं हे कोणालाच शक्य नसतं, त्यामुळे या खेळात एकापाठोपाठ एक सगळेच बाद होतात व खेळ नव्याने सुरू होतो..

सूरपारंब्या

या खेळासाठी जरा मोठया झाडांची आवश्यकता आहे. कारण त्यावर चढून, उडया मारुन खेळ खेळायचा आहे. झाडाच्या फांद्या पक्क्या हव्यात. २/३ पासून कितीही मुले हा खेळ खेळू शकतात. अंगणात एक गोलाकार रेखून त्यामधे एक काडी- काठी ठेवायची एकावर राज्य व इतरांपैकी एकाने पाया खालून वर्तुळातील काठी लांब फेकायची. राज्य असलेल्या मुलाने ती काठी आणून वर्तुळात ठेवायची तेवढया वेळात इतर मुलांनी पटापट झाडावर चढून जायचे किंवा वडा सारख्या झाडाच्या पारंब्याला लोंबकळून पाय जमिनीच्या वर घ्यायचे कुणी खाली राहिल्यास त्याला राज्य घेतलेल्या मुलाने पकडायचे- आऊट करायचे, किंवा २ मुलाने झाडावरुन उडी मारुन काठी पुन्हा पायखालुन फेकण्याचा प्रयत्न करायचा व राज्य असलेल्या मुलाने पटकन कुणाला तरी पकडायचे जो आऊट होईल त्याच्यावर राज्य. पुन्हा सर्वांनी पळत जाऊन झाडावर चढायचे.

सागरगोटे/गजगे

दोन व त्यापेक्षा अधिक कितीही मुली हा खेळ खेळू शकतात. या साठी सागरगोटे लागतात. हे एका झाडाला येतात. सागरगोटयाच्या झाडाला काटे असतात. म्हणून तयार बाजारातून आणावे. (नसल्यास वाळूतील सारख्या आकाराचे गोलाकार गुळगुळीत बोरा एवढे दगड ही चालतील) कमीत कमी ५ गोटे हवेत. दोन्ही जणी समोरासमोर बसून हा खेळ खेळायचा (अधिक मुली असल्यास गोलाकार बसावे) एका हाताने पाची सागर गोटे जमिनीवर हळूच पसरवून टाकायचे शक्यतो एकमेकाला चिकटू नयेत चिकटल्यास दुस-या मुली कडून मुंगीला वाट मागावी हळूच सरकवून अलग करावे. एक सागरगोटा उंच हवेत उडवून तो खाली येण्याच्या आत जमिनीवरचा दुसरा एकच सागर गोटा उचलावा व उंच उडवलेला सागरगोटा झेलावा असे झेलत उचलत जावे. उचलतांना झेलतांना सागरगोटा खाली पडला तर डाव गेला. नाहीतर पुन्हा खेळायचे पहिल्या डावाला एरखई म्हणतात, दुस-या डावाला दुरखई, तिस-याला तिरखई, चौखई असे. दुस-या वेळी एक सागरगोटा उंच फेकल्यावर खालील दोन सागरगोटे एकदम उचलायचे. तिरखईला ३ उचलायचे अशात-हेने पहिली फेरी संपते. दुस-या फेरीत 'उपली सुपली' करायची म्हणजे सर्व सागरगोटे दोन्ही हातांनी (ओंजळीने ) हळूच वर उडवायचे व सर्वच्या सर्व हाताची उपली ओंजळ करुन त्यात पकडायचे. यातही ३ प्रकार एकदा एकच हात उलटा करायचा उजवा डावा मग दोन्ही पाच खडे घेतले असल्यास प्रत्येकी पाच वेळा असे करायचे. तिस-या फेरीत 'चिमणी कोंबडयाची चोच' करायची म्हणजे दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुफुंन अडकावयाची आणि फक्त दोन्ही हाताचे पहिले बोट सोडून त्या दोन बोटांनी खाली टाकलेले खडे एक एक करुन ओंजळीत टाकायचे. सर्व खडे टाकुन होईपर्यंत एकही गोटा खाली पडता कामा नये. चौथ्या फेरीत 'हंडी चढवायची’ म्हणजे पाच खंडयापैकी दोन दोन खडे जोडून जमिनीवर ठेवायचे व पाचवा खडा उंच फेकून, दोन खडयांची जोडी उचलायची व वरचा खडा झेलायचा नंतर परत एक खडा वर फेकून जमिनी वरची दुसरी जोडी उचलायची व पहिली जोडी जमिनीवर ठेवायची. असे लागोपाठ सतत ५० ते १०० वेळा (जेवढयाची हंडी ठरली असेल तेवढे) करायचे म्हणजे ती जिंकली. ऐरखई- दुरखई करतांना डाव गेला तर दुस-या भिडूला खेळू द्यायचे व पुन्हा आपला नंबर आला की पुढील डाव खेळायचा सर्व फे-या जिच्या लवकर पु-या होतील ती जिंकली. एकदा सवय झाली की खडे ५-७-९ असे वाढवता ही येतात.

विटी-दांडू

विटी-दांडू या खेळात विटी आणि दांडू या दोन गोष्टी असतात. हा खेळ वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही पद्धतीने खेळता येतो. ओलीसुकी (टॉस) करून राज्य कुणावर ते ठरवलं जातं. एखाद्या चपटय़ा खापरीला एका बाजूला थुंकी लावून ओलीसुकी केली जाते. जो ओलीसुकी जिकंतो तो पहिल्यांदा विटी उडवतो. या खेळासाठी मैदानात एक गल म्हणजे थोडा लांब खड्डा तयार करायचा. या गलवर विटी आडवी ठेवायची. गलमध्ये ठेवलेली ही विटी दांडूच्या सहाय्याने उडवायची. ही विटी उडवताना समोर उभ्या असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी तिचा झेल पकडला तर तो खेळाडू बाद. विटीचा झेल घेता आला नाही, तर मग त्या गलवर दांडू आडवा ठेवायचा. मग प्रतिस्पर्धी खेळाडू त्याला विटीने मारण्याचा प्रयत्न करतात. जर दांडूला विटी लागली तर खेळाडू बाद. तो बाद झाला नाही तर मग त्याने विटीने गुण मिळवायचे.
यासाठी विटीच्या एका टोकावर दांडू मारून ती विटी हवेत उडवायची आणि जमिनीवर पडू न देता वरच्यावर उडवायची. विटी केवळ दांडूच्या सहाय्याने हवेत उडवणं हे या खेळातलं सगळ्यात मोठं कसब असतं. त्याला आबकदुबक असे म्हणतात. त्यानंतर दांडूच्या सहाय्याने विटी बॅटने बॉल मारतो त्याप्रमाणे दूर भिरकवायची. ती जिथे पडेल तिथे जाऊन पुन्हा ती दूर भिरकवायची. हे करताना विटी जमिनीवर पडली की, खेळाडू बाद होतो. हा खेळाडू विटी घेऊन जाईल तिथून त्याने केलेल्या आबक, दुबकच्या प्रमाणात अंक मोजले जातात. हे झाले संघाचे गुण. आबकप्रमाणेही गुण मोजले जातात. विटी एकदाच मारली, तर हे अंतर दांडूने मोजलं जातं. विटी हवेत एकदा हलकेच उडवून मारली म्हणजे आबक केलं असेल तर अध्र्या दांडूने हे अंतर मोजलं जातं आणि जर दुबक केलं असेल तर विटीने मोजायचं. साहजिकच आबकदुबक करण्याचं कौशल्य जास्त असेल गुण जास्त होतात. विटी-दांडूचा हा खेळ भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, नेपाळ, कम्बोडिया, इटली या देशांमध्येही खेळला जातो.

डब्बा ऐसपैस

डब्बा ऐसपैस हा लपाछपीचाच खेळ असतो. मात्र या लपाछपीत डब्याचा आणि (डबा नसेल तर नारळाच्या करवंटीचा) वापर केला जातो. पाच-सहा किंवा त्याहून जास्त खेळाडू हा खेळ खेळू शकतात. या खेळात आधी राज्य कुणावर ते ठरवलं जातं. नंतर जमिनीवर एक गालोकार रिंगण आखलं जातं. नंतर एक जण डबा किंवा करवंटी लांब फेकतो. राज्य असलेल्याला ती तिथून आणून रिंगणात ठेवावी लागते. तोपर्यंत सगळे खेळाडू लपतात.
राज्य असणा-याला त्यांना शोधावं लागतं. त्याला कुणी सापडलं तर ‘अमुक तमुख डब्बा ऐसपैस’ असं म्हणत डब्यावर काठी आपटून त्या खेळाडूला बाद करतो. या प्रकारे सगळे खेळाडू बाद होईपर्यंत खेळ चालू राहतो, पण एखादा त्याने डब्बा ऐसपैस करायच्या आधी डबा किंवा करवंटी पायाने रिंगणातून बाहेर फेकण्यात यशस्वी झाला तर त्याच खेळाडूवर पुन्हा राज्य येतं. त्याने आधी कितीही जणांना डबा ऐसपैस केलं असेल तरी त्याचा उपयोग नसतो. हा खेळ तसा साधा-सोपा असला तरी तो खेळायला अनेक गडी लागतात, तसंच जागाही मोठी लागते.