जि.प. शाळा सिद्राममळा च्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत ……….

Sunday 1 November 2015

क्षण सोनेरी

आयुष्यात असे काही क्षण येतात की ज्यानंतर जाणीव होते कि आपला प्रवास योग्य दिशेने चालू आहे की नाही.
आपल्या जगण्याची कारणं शोधायला लावणारा  तो क्षण आपल्याला जगणं शिकवून जातो.
असाच अनुभव मी आज घेतला.
गेल्या महिनाभरात अनेक दानशूर व्यक्तींकडून जमा केलेले धान्य आणि कपडे आज ज्ञानगंगोत्री प्रतिष्ठान संचलित "ज्ञानगंगोत्री मतिमंद मुलांची निवासी शाळा" येथे जमा करण्याचे नियोजन केले गेले.
आपण खूप मोठे आहोत आपण जिल्हा परिषद शाळेत काम करतो म्हणजे आपण सर्वांपेक्षा वेगळे आहोत अशी अनेक लक्तरं उराशी बाळगून आजपर्यंत जगत आलो ती सगळी शाळेत पोचल्यावर  क्षणार्धात गळून पडली.
परमेश्वराने या मुलांना घडवताना काहीतरी कमतरता ठेवली अस आपण समजतो पण तिथ गेल्यावर लक्षात येत की कोणत्याही परिस्थितीत चेहऱ्यावर हसू ठेवून जगण्याची जिद्द परमेश्वराने त्यांना दिली आहे जी आपल्याला उघड्या डोळ्यांनी देखील दिसत नाही.
मुलांना पाहून लहान लहान गोष्टींवरून चरफडणार्या स्वतःची कीव येते.
या विशेष मुलांसोबत थोडासा वेळ घालवल्यावर मनाशी ठरवल की आयुष्यात कधी ताण आला संकट आली की या छोटया मित्रांना भेटायला यायचं.


शासकीय मदतीची वाट न पाहता शाळा हेच आपलं घर मानणारे संस्थापक श्री.कसबे सर यांच कौतुक कराव तितकं थोडं.
अनेक अडचणी आणि नव्या दिवसासोबत येणाऱ्या संकटांना पायदळी तुडवत त्यांचा प्रवास सुरू आहे.
एकीकडे सामान्य मुलांना परीक्षेत पास होण्याइतपत ज्ञान देऊन खूप मोठं काम केल्याच्या अविर्भावात असलेलं आपलं जगणं आणि दुसरीकडे सामान्य मूलभूत क्षमतादेखिल अवगत नसलेल्या विद्यार्थांना जीवनकौशल्य शिकवण्याची इथल्या शिक्षिकांची जिद्द.........
पालकांनी दुर्लक्ष केलेल्या चिमुरड्याना स्वतःच्या मुलांसारखी माया लावणार्या कसबे सर आणि त्यांच्या सहकारी वर्गाला मानाचा मुजरा ........


सर्व मित्र आणि मैत्रिणी ज्यांनी या कार्यासाठी माध्यम म्हणून माझी निवड केली त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार

कसल्याही अपेक्षेविना नकळत पणे तुमच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा उमटवणारी ही बच्चेकंपनी तुमच्या फक्त सहवासाने देखील आनंदून जाईल.

सर्वांनी अवश्य भेट द्या.



ज्ञानगंगोत्री मतिमंद मुलांची निवासी शाळा
रायकर मळा
धायरी पुणे
उमेध धावारे......