जि.प. शाळा सिद्राममळा च्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत ……….

Monday 23 November 2015

फ्रीडम वॉल

ग्रामीण शाळेतील मुलं शहरी भागातल्या शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे चुटूचुटू बोलत नाहीत. यामध्ये मुख्य अडसर असतो तो भाषेचा ! ग्रामीण भागातील मुलांच्या बोलण्यात बोली भाषेचा वापर जास्त होत असल्याने भाषिक न्युनगंडाने पछाडलेली मुलं अशा शाळांमध्ये दिसतात. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषेच्या भिंती उभ्या राहतात. मुलांना त्यांच्या मनातलं शिक्षकांना सांगता येत नाही आणि मुलांच्या मनात काय चाललय, हे शिक्षकांना ओळखता येत नाही. त्यामुळे ही मुलं लाजरी-बुजरी आणि अबोल होतात.

मुलांना जाणवणारा हा भाषिक अडसर दूर करुन त्यांना त्यांच्याच भाषेत व्यक्त होण्याची संधी आसगावच्या जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली. शाळेतीलच एक भिंत काळ्या रंगाने रंगवण्यात आली. या भिंतीवर मुलांनी त्यांच्या मनातलं बिनधास्त लिहावं असे सांगण्यात आले. मुख्य म्हणजे भिंतीवर लिहिताना नाव न लिहिण्याची सूट देण्यात आली. या भिंतीचं फ्रिडम वॉल असं नामकरण करण्यात आलं.

नाव न लिहिता मनात येईल ते लिहिण्याची आणि ती सुद्धा बोली भाषेत व्यक्त होण्याची संधी मिळाल्यामुळे या वॉलवर मुलं बिनधास्तपणे लिहायला लागली. त्यांच्या मनातल्या शाळेविषयीच्या, शिक्षकांविषयीच्या भावना या भिंतीवर व्यक्त व्हायला लागल्या. वेळ मिळेल त्या-त्या वेळी विद्यार्थी भिंतीवर लिहितात. अनेक विषय मुलं त्यावर लिहित असतात. त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांमध्ये 'परीक्षा नसत्या तर, मोठी माणसे अशी का वागतात? शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी कसं वागावं, इथपासून ते माझी पहिली चोरी .... इथपर्यंत' असे एक ना अनेक विषय या भिंतीवर पहायला मिळतात. मुलांच्या मनातील आक्रंदने, आनंद, उत्साह, राग, व्देष, निषेध अगदी कबुली-जबाबसुद्धा या स्वातंत्र्य भिंतीवर उमटायला लागले आहेत.

या फ्रीडम वॉलमुळे शाळेतील लाजऱ्या-बुजऱ्या न बोलणाऱ्या मुलांमध्ये कमालीचा फरक दिसून येतोय. श्रीकांत हा याच शाळेतील मंदगती विद्यार्थी अडखळत बोलायचा. बोलताना विचित्र हातवारे, एकच गोष्ट वारंवार सांगण्याची त्याला सवय होती. हाच श्रीकांत फ्रीडम वॉलवर लिहायला लागला. त्या भिंतीचे कोपरे नक्षीकाम करुन सजवायला लागला, तसा त्याच्या वागण्या बोलण्यातही कमालीचा फरक दिसून येऊ लागला. हा अतिशय सकारात्मक परिणाम या फ्रीडम वॉलमुळे काही विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतोय, असे शाळेचे मुख्याध्यापक बी.बी. बावणे यांनी सांगितले. या फ्रीडम वॉलमुळे विद्यार्थ्यांच्या अंतरंगात डोकावण्याची वाट शिक्षकांना मिळाली, अशी प्रतिक्रिया या फ्रीडम वॉलची कल्पना मांडणाऱ्या शिक्षिका स्मिता गालफाडे यांनी व्यक्त केली.


स्त्रोत : महान्यूज